याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कोंढणपूर गावच्या परिसरात चार जणांना चारचाकीतून फिरत असताना पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यावरून राजगड पोलिसांनी किरण तानाजी ननावरे (वय २१), सागर नानासो. लिम्हण (वय २०), स्वप्नील ऊर्फ नाना दत्तू पवार (वय २४ ), विजय विलास लिम्हण (वय ३० वर्षे, सर्व रा. पारवडी, ता. भोर) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपास सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस हवालदार अजित माने, महेश खरात, संतोष तोडकर, भगीरथ घुले, संतोष दावलकर यांचे तपास पथक नेमण्यात आले होते. तपास पथकाने त्यांना गाडीसह ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि .२४ रोजी संध्याकाळी फिर्यादी गोपाळ एकनाथ मसुरकर (रा. सांगवी) व प्रकाश म्हस्कू लिम्हण (रा. पारवडी) हे दोघेजण सांगवी बु. गावचे हद्दीत नसरापूर ते वेल्हा जाणारे रोडलगत उभे असताना अचानक एक निळसर रंगाची कार (एम.एच.४२/४७७६) आली. त्यामध्ये पारवडी गावातील नान्या दत्तू पवार व त्याचे सोबत इतर अज्ञात ५ ते ६ जण गाडीतून येऊन खाली उतरले. त्यापैकी एकाच्या हातामध्ये लोखंडी कोयता व दोघांचे हातामध्ये लाकडी दांडके होते. त्यांनी फिर्यादी यांचा मित्र प्रकाश म्हस्कू लिम्हण यांच्या डोक्यामध्ये सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करून दांडक्याने मारहाण केली होती. फिर्यादीने त्यांना अडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी फिर्यादी यांना दमदाटी करून ढकलून दिले. प्रकाश लिम्हण यांना जास्त मार लागल्याने ते जमिनीवर पडले, त्या वेळी तेथून हल्लेखोर वेल्हा बाजूकडे निघून गेले होते.