पुणे : तब्बल १८७८ किलोच्या गांजा तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीला एनडीपीएस कोर्टाने २१ जुलैपर्यंत महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) कोठडीत तर अन्य पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिला.
त्यानुसार, धर्मराज शिंदे याला डीआरआय कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अभिषेक धावटे, श्रीनिवास पवार, विलास पवार, अविनाश भोंडवे व विनोद राठोड यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
केंद्रीय महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या अधिका-यांनी १८७८ किलो गांजा तस्करीप्रकरणी या सहा जणांना शुक्रवारी जेरबंद केले होते. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. गांजा आणण्यात आरोपी धर्मराज शिंदे याची मुख्य भूमिका असल्याने पुढील तपासासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी केली. त्यावर आरोपी धर्मराजने तपासात या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले असून, त्याला कोठडी देण्याची गरज नाही, असा दावा बचाव पक्षातर्फे करण्यात आला. कोर्टाने विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत आरोपी धर्मराज शिंदे याला ‘डीआरआय’ कोठडी सुनावली.
अननस, फणसाच्या गोण्यातून गांजा तस्करी
शहरातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी गांजा तस्करी उघडकीस आली असून, आरोपींनी अननस व फणसाच्या गोण्यांमध्ये फळांखाली गांजा लपवून ठेवला होता. हा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याचे मूल्य अंदाजे पावणेचार कोटी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.