पुणे : आंध्र प्रदेशमधून पुण्यात वाहनामधून गांजा आणताना अमली पदार्थ विक्री विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून आरोपींना पकडले. या छाप्यामध्ये एकूण ८६८ किलो व्यावसायिक गांजा जप्त करण्यात आला. या गांजा तस्करी गुन्ह्यामधील आरोपीने जामिनावर मुक्त होण्यासाठी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला. मात्र, विशेष न्यायाधीश (एनडीपीएस) ए.एन. मरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
जब्बार मुल्ला असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. जून, २०२० मध्ये पुण्यातील अमली पदार्थ विक्री विभागास आंध्र प्रदेशमधून पुण्यात आलेल्या वाहनामध्ये गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाली. या वाहनांवर लक्ष्य ठेवून अधिकाऱ्यांनी छापा मारून आरोपींना पकडले. त्यांना न्यायालयासमोर हजर करून, येरवडा कारागृहात त्यांची रवानगी केली. या गुन्ह्यामधील एक आरोपी जब्बार मुल्ला याने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला. अमली पदार्थ विक्री सीमा शुल्क खात्याच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप घाटे यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी त्याने हा गुन्हा केला नसून, त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. यावर ॲड.घाटे यांनी हरकत घेऊन प्रचलित सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले दिले व दोषारोपत्र दाखल असले, तरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस जामिनावर मुक्त करता येत नाही, असा युक्तिवाद केला. ॲड.घाटे यांचा युक्तिवाद मान्य करून, न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपी जब्बार मुल्ला हा अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना आश्रय व आर्थिक रसद पुरविण्याचे बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याची माहिती समोर आली आहे, तसेच आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे असल्याचे मत विशेष न्यायाधीश ए.एन. मरे यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे. अधीक्षक मदन देशमुख व कस्टम वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख यांनी तत्पर कारवाई करून, आरोपीस मुद्देमालासह जेरबंद केले.
-----------------------