Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप

By राजू इनामदार | Updated: February 26, 2025 19:04 IST2025-02-26T19:03:08+5:302025-02-26T19:04:54+5:30

आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल

Accused cannot have any punishment other than death Ajit pawar anger over the Swargate incident | Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप

Ajit Pawar: आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही; स्वारगेट घटनेबाबत अजितदादांचा संताप

पुणे:स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे झालेली घटना पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीला अटक झाली असून त्याला कठोर शासन होईल असे आश्वासन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.  

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही असे म्हणत अजितदादांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेबाबत सर्व संबधितांची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करू असे सांगितले.

अजित पवार म्हणाले, मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत."

मिसाळ यांनी सांगितले की, परगावी असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांबरोबर बोलले. त्यांना सखोल तपास करण्याविषयी सांगितले. आरोपीला अटक झाल्याचे समजले. पोलिस आता पुढील कार्यवाही करतील. दरम्यान स्वारगेट तसेच अन्य बसस्थानकांमधील सुरक्षेविषयी, त्यातही प्रामुख्याने रात्रीच्या वेळी, पहाटे महिलांच्या सुरक्षेविषयी काय उपाययोजना करता येतील याविषयी सर्व संबधितांची बैठक घेऊ. त्यात यावर चर्चा करून निश्चित होतील ते उपाय त्वरीत अमलात आणले जातील.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात प्रतिक्रिया देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस आयुक्तांबरोबर संपर्क साधला. त्यांना सखोल तपासाचे आदेश दिले. आरोपीची ओळख पटल्यावर पोलिसांनी तातडीने तपास करून त्याच्या घरापर्यंत माग काढला, त्याच्या भावाला ताब्यात घेत त्याची माहिती मिळवली व त्यालाही अटक केली. आता त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिस काळजी घेतील असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमांवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यात अनेकांची विविध कारणांनी येजा असते. त्यामुले सगळीच बसस्थानके सतत गजबजलेली असतात. पोलिसांनी अशा वेळी अधिक जागरूक राहून विशिष्ट वेळांमध्ये सर्तक रहायला हवे. तसे पोलिसांना सांगण्यात येईल असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. राज्यात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे होत आहेत. याचे कारण गुन्हेगारांना आता पोलिसांचा, कायद्याचा काहीच धाक वाटत नाही हेच आहे. पोलिसांच्या कामात वारंवार राजकीय हस्तक्षेप केला जातो यामुळे त्यांचे मनेधैर्य कमी झाले आहे तर गुन्हेगारांचा धाडस मात्र वाढले आहे असे त्या म्हणाल्या. काहीही केले तरी आपल्या मागे वाचवणारे आहेत हा त्यांचा विश्वास कमी होईल, त्याचवेळी गुन्हे कमी होतील असे त्यांनी सांगितले.

Web Title: Accused cannot have any punishment other than death Ajit pawar anger over the Swargate incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.