पुणे: ससून रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस शिपाई निखिल अरविंद पासलकर आणि पोलिस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लुईस लीलाकर (रा. आकुर्डी) याला अटक करण्यात आली होती. मार्शलने समाजमाध्यमात स्वाती यांना धमकी देणारी ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून मार्शलला अटक केली होती.
न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले होते. फरासखाना-विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कोठडीत मार्शलला ठेवण्यात आले होते. त्याने रविवारी (ता. ११) पहाटे छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई पासलकर आणि खाडे त्याला घेऊन ससून रुग्णालयात गेले.
बाह्य रूग्ण उपचार कक्षात मार्शलची तपासणी सुरू असताना तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. मार्शल पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत पोलिस कर्मचारी खाडे आणि पासलकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने दोघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.