पुणे : कोंबड्या चोरुन नेल्याच्या आरोपातून दोघांनी सत्तूरने डोक्यात आणि खांद्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते. पौड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. जवळपास गेल्या एक महिन्याहून अधिक काळ ते कारागृहात आहेत. त्यांच्यातील एकाची परीक्षा असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने विद्यार्थ्याला जामीन मंजूर केला.
रजत हिरामण दगडे (वय २०, रा बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने ॲड. ऋषीकेश सुभेदार यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचे नातेवाईक गणेश दिलीप शेडगे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी विजय येनपुरे (वय ३९, रा. भूगाव) यांनी पौड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शेडगे यांच्या गोठ्यातून कोंबड्या चोरीला गेल्या होत्या. त्या फिर्यादी यांना चोरल्याच्या संशयावरुन येनपुरे यांना २९ डिसेंबर रोजी बेदम मारहाण करण्यात आली होती. गैरसमाजातून ही मारहाण झाली. यावेळी भांडणे साेडविण्यासाठी आलेल्या अश्वजीत पवळे व सुरज शेडगे यांनाही मारहाण झाली होती. याप्रकरणी दगडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. आपली परीक्षा आहे. तसेच वादात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा न सापडल्याने जामीन देण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. तो ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोने यांनी दगडे याचा जामीन मंजूर केला.
आरोपी हा शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवले तर शिक्षण आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.