नीरा : नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथे शुक्रवारी झालेल्या खून प्रकरणांमध्ये दहा आरोपींना सासवड येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये पत्नीसह दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपासासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
पुरंदर तालुक्यातील पिंपरे (खुर्द) येथे शुक्रवारी संध्याकाळी हरिश्चंद्र थोपटे यांच्यावर चेहऱ्यावर व गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. हा खुन अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यादृष्टीने तपासाची चक्रे पोलीसांनी फिरवत आधी पत्नी व नंतर नऊ जणांना दोन तासात ताब्यात घेतले होते. यानंतर पोलिसांनी काल शनिवारी संध्याकाळी पत्नीसह नऊ जणांना अटक करत, माध्यमांना घटनेची व संशयितांची माहिती दिली होती.
चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली होती. आज रविवारी या आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची म्हणजेच गुरुवार पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. या पाच दावसांमध्ये आणखी काही पुरावे हाती लागतात का? त्याच बरोबर आणखी काही लोकांचा यामध्ये सहभाग आहे का? त्याचबरोबर गुन्ह्या संदर्भात असलेले पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यामुळे कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नी पुजा हरीशचंद्र थोपटे आणि तिचा प्रियकर प्रणव ढावरे यांनी थोपटे यांना मारण्यासाठी एका टोळीला सुपारी दिली होती. या टोळी संदर्भात पोलीस अधिकचा तपास करीत आहे. याबाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण बापूराव सांडभोर यांनी दिली आहे.