पुणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या तरूणाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. नऊ महिन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा दावा निकाली काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिला होता. त्यानुसार सुनावणी करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी हा निकाल दिला.
स्वप्नील जनार्धन सोनवणे (रा.भोर) असे निर्दोष मुक्तता केलेल्या तरुणाचे नाव आहे. बचाव पक्षाकडून सादर केलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणात राजगड पोलिसांनी सोनवणे याला बलात्कार व बाललैंगिक अत्याचारानुसार दाखल गुन्ह्यात अटक केली होती.
या प्रकरणात पीडित सात महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन नाकारला होता. तो चार वर्ष कारागृहात होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी हे प्रकरण नऊ महिन्यात निकाली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिले होते.