पुणे : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर ३५३,१२०,३०७,३३२ कलमान्वे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली.
नेमकं काय घडलं?
आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कात्रज परिसरात येणार होते. त्यामुळे या परिसरात अगोदर पासून तणाव होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. आदित्य ठाकरे हे सभेनंतर थेट मुंबईला जाणार होते. ठाकरे यांनी अचानक शंकर महाराज मठाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्वारगेटकडील रस्ता पोलिसांनी क्लिअर केला. तोपर्यंत ठाकरे यांचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे अगोदर गेली. मात्र उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. त्यावेळी सभा संपल्यानंतर संपूर्ण चौकात शिवसैनिकांनी भरला होता. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पहाताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली.