पुणे : पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाख रुपयांची रोकड लंपास करणारा फरार आरोपी सहा वषार्नंतर पोलिासांच्या जाळ्यात सापडला. सापळा रचून पोलिसांनी त्याला टिळक रस्त्यावर पकडले.
गणेश दत्तोबा नेवसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सन २०१४ मध्ये पुणे-सातारा महामार्गावर मोटारचालकाला धमकावून ४९ लाखांची रोकड लुटण्यात आली होती. त्याच्यासह इतर आरोपींविरूद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अन्य आरोपींना पकडण्यात यश मिळाले. मात्र, आरोपी नेवसे फरार होता.
नेवसेचा वावर कात्रज, धायरी, पर्वती भागात असल्याची माहिती मिळाली होती. होता. मात्र, तो वेगवेगळ्या भागात राहत असल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. टिळक रस्त्यावरील एका गल्लीत नेवसे थांबल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि सागर सुतकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील लोहार, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शिवाजी क्षीरसागर, विष्णू सुतार, राहुल ओलेकर यांनी ही कारवाई केली.
-----------------------