पुणे : पौड रोड पोलीस ठाणे येथे विजय मिरगे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या मयूर सणस याचा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हा आदेश दिला आहे.
विजय मिरगे यांच्या खूनप्रकरणी २४ डिसेंबर २०१५ रोजी सचिन मिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सणसला पोलिसांनी २ डिसेंबर २०१५ ला अटक केली. या प्रकरणातून जामीन मिळावा, म्हणून सणस याने अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जावर सुनावणीच्यावेळी अॅड. निकम यांनी युक्तिवाद केला, की सणस हा आरोपी या गुन्ह्यात खोट्या रीतीने गोवण्यात आले आहे.
सणस याचा मोक्का कायद्यांतर्गत अटक असलेला आरोपी तुषार गोगावले याच्यासोबत इतर कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नव्हता, म्हणून सणसवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करून अटक करून ठेवणे चुकीचे आहे. हा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने सणसला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.