बाभुळगाव : गुन्हेगार कितीही हुशार आणि खोटे बोलण्यात तरबेज असला तरी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो कधीही सहजासहजी सुटत नाही. इंदापूर तालुक्यातील नीरनिमगाव येथे झालेल्या खून प्रकरणात या घटनेचा प्रत्यय आला. खून करून फरारी असलेल्या खऱ्या गुन्हेगाराला इंदापूर पोलिसांनी चाणाक्ष नजरेने हेरून त्याला गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शंकर लक्ष्मण केंगार (सध्या रा. नीरनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे. मूळ रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. नीरनिमगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील शेतात महावीर जयकुमार देवळकर (वय ५४, रा. भगतवाडी, ता. इंदापूर) याचा १ मार्चला काही अज्ञातांनी डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून खून केला होता. या प्रकरणी देवळकर यांची पत्नी सुवर्णा देवळकर यांनी फिर्याद दिली होती. नात्यातील दोन पुतणे व शेजारील एका बांधकऱ्यांवर खुनाचा संशय व्यक्त करून त्यांनीच खून केल्याचा संशय व्यक्त केला होता.
इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. लातुरे हे तपास करत असताना त्यांच्या मनामध्ये संशयित आरोपींबाबत मनात शंकेची पाल चुकचुकत होती. त्यामुळे त्यांनी घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला असता तिसराच आरोपी खून प्रकरणात सामील असल्याचे लक्षात आले. ५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६:१८ वाजता या प्रकरणातील खरा खुनी आरोपी जनतेसमोर आणून शंकर लक्ष्मण केंगार (वय ३५) याला बेड्या ठोकत जेरबंद केले सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात आरोपी शंकर केंगार याची पत्नी व आणखी तीन जणांचे जबाब आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाचे ठरले असल्याचे
पोलीस तपासात समोर आले आहे. तर घटनास्थळावरून आरोपीबाबत पोलीसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून महावीर केळकर यांचा खून शंकर केंगार यानेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे पूर्वी संशयावरून अटक करण्यात आलेले दोन आरोपी व आणखी
एक संशयीत यांचा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पो. नि. बी. एन. लातुरे यांनी दिली.