पुणे : अल्पवयीन मुलीला मारहाण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद देण्याचे आदेशात नमूद केले आहे. सत्र न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी हा निकाल दिला आहे.
नवनाथ दत्तात्रय कांबळे (वय १९, सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ ता. उदगीर, जि. लातूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२० रोजी फिर्यादीच्या घरी घडली. भादंवि ३७६, ३२३, ५०४, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार २०१२ कायद्याचे कलम ८.१२ नुसार त्याच्यावर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पीडित मुलीचे आईवडील घराबाहेर गेलेले असताना आरोपीने घरात येऊन मुलीला मारहाण व दमदाटी करीत मुलीवर बलात्कार केला. हे जर कुणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकीही आरोपीने दिली.
मुलीने ही गाेष्ट आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. शिक्रापूरचे सहायक निरीक्षक किरण भालेकर यांनी तपास केला. सरकारी वकील जावेद खान, विजय फरगडे आणि विलास पठारे यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोलिस हवालदार एस. बी. भागवत, कोर्ट पैरवी अंमलदार विद्याधर निचित, सहायक निरीक्षक आकाश पवार आणि रज्जाक शेख, हवालदार प्रफुल्ल सुतार यांनी केससाठी सहकार्य केले.