येरवडा: पत्नीच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पतीने ससून रुग्णालयाच्या आवारातून पोलिसांच्या हातावर तुरी देत मंगळवारी सकाळी पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पलायन करून गेलेला किशोर आत्माराम शिरसाट (वय 39 रा. लक्ष्मीनगर येरवडा) याला ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर शिरसाठ याने पत्नी जयश्री हिचा 21 सप्टेंबर 2021 रोजी पाठीत चाकुने भोकसून निर्घुण खून केला होता. गुन्हा करून तो फरार झाला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. दरम्यान दाखल गुन्ह्यात येरवडा मध्यवर्ती कारागृह न्यायाधीन बंदी म्हणून शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी लघुशंकेचा बहाना करून तो बाथरुम मध्ये गेला. तेथून त्याने पलायन केले. यावेळी त्याच्या सोबत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी किशोर याचा शोध सुरू केला.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा येथील इंद्रप्रस्थ उद्यानाच्या मागील बाजूस तो लपून बसला असल्याचे खात्रीशीर माहिती येरवडा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अजय पडोळे, गणेश शिंदे यांच्यासह सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, पोलीस नाईक कैलास डुकरे यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पळून गेलेल्या किशोर शिरसाठ याला येरवडा पोलिसांनी मुख्यालय विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.