लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले नवनाथ बन्सी थोरात (रा. रांजणी ता. आंबेगाव) यांनी घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. या आत्महत्येस त्यांच्याच भावकीतील चुलत सासरे व त्यांचे कुटुंबीय जबाबदार असल्याची फिर्यादी दिल्यानंतर चौघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: वैभवी नवनाथ थोरात यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ बन्सी थोरात याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. थोरात हे १३ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय येथे पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची भेट न झाल्याने थोरात यांनी त्यांच्या कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी थोरात यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर ते १७ फेब्रुवारी रोजी उपचार घेऊन घरी आली होते. शुक्रवारी (दि.१९) नवनाथ थोरात घरी असताना फिर्यादी महिलेचे चुलत सासरे निवृत्ती संभाजी थोरात हे घराच्या बाजूला असलेल्या शेतात येऊन नवनाथ यांच्यावर ओरडत तुझ्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करतो. तू यातून कसा बाहेर पडतो ते पाहतो. तुझे संपूर्ण कुटुंब संपवून टाकतो अशी धमकी दिली. यावेळी चुलत सासरे बरोबर चुलत जाऊ, चुलत सासू, चुलत दीर उपस्थित होते. त्यानंतर ते घरी निघून गेले. फिर्यादीचे सासू-सासरे त्यांचे दुकान उघडण्यासाठी कारफाटा येथे निघून गेले. त्यावेळेस नवनाथ थोरात यांनी पत्नीला दुकानाची चावी घरी राहिली असून ती घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी चावी घेऊन गेली असता नवनाथ थोरात यांनी घरी कोणी नसताना सकाळी ११.३० च्या दरम्यान घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात निवृत्ती संभाजी थोरात, स्वाती नितीन थोरात, भामाबाई निवृत्ती थोरात, नितीन निवृत्ती थोरात (सर्व रा. रांजनी ता.आंबेगाव) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.