पुणे : महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्यापासून ती गर्भवती राहिली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के.के.जहागीरदार यांनी हा निकाल दिला. ऋषीराज बाबासाहेब शेळके (वय-२२,रा.भांडगाव, ता.दौंड,पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपी व पीडित मुलीची येरवडा येथील एका महाविद्यालयात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक पीडितेला देत दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे त्याने वचन दिले. त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये त्याने मुलीस एका लॉजवर नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला व तिला पुन्हा महाविद्यालयात सोडले. त्यानंतर थोडयाच दिवसात मुलीस दिवस गेल्याचे कुटुंबियांना समजले व तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र, गर्भपाताची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली व पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्यात तिने आरोपीमुळे मला दिवस गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन गर्भाचा डीएनए तपासणीस पाठवून खातरजमा केली.
सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयीन सुनावणीत पीडित बालिका अज्ञान असल्याचे व तिचा गर्भपात व रासयनिक प्रयोगशाळा तपासणीचा डीएनए अहवालावरून आरोपी हाच गर्भाचा जनुकीय पिता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अरुंधती ब्रहमे यांनी केला. न्यायालयाने पीडित मुलगी व डॉक्टरांची साक्ष ग्राहय मानत आरोपीला बलात्कार प्रकरणी १२ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजार दंडाची शिक्षा दिली. दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्र भोगायच्या आहे. तसेच फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या केसचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी केला.