पुणे : पूर्वीच्या भांडणातून कोयत्याने वार करीत दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस खडक पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिध्दार्थ नंदकुमार हादगे (वय २७, रा. ७६७, गणेश पेठ, बुरूड आळी) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी शुभम नंदू हादगे (वय २४, गणेश पेठ) याला सोमवारी ( दि. १९) अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या हल्ल्यात तुषार राजू कुंदूर (वय १८, रा. गणेश पेठ) हा जखमी झाला आहे. त्यासह भांडण सोडविताना जखमी झालेला त्याचा भाऊ आशिष कुंदूर(वय २०) यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश पेठेत रविवारी (दि. १८) रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
तुषार कुंदूर हा मित्रांसोबत गप्पा मारत असताना आरोपी सिध्दार्थ हादगे याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तुषारवर कोयत्याने वार केले. दरम्यान, तुषार याचा भाऊ हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्याच्यावरही वार करून जखमी केले.
सिध्दार्थने केलेल्या हल्ल्यात तुषारच्या एका हाताची चार बोटे तसेच दुस-या हाताचा अंगठा तुटला आहे. तसेच अशिषच्या हातावरही गंभीर जखम झाली आहे. सिध्दार्थ हा अभिलेखावरील गुन्हेगार असून खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयात वापरलेला कोयता, कपडे जप्त करणे व तपास करण्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल किरण बेंडभर यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
-------------------------