पुणे : साहेब, माझे २० डिसेंबरला लग्न आहे. त्यामुळे मला काही दिवसांसाठी जामीन द्यावा, लग्न झाल्यानंतर मला पुन्हा कोठडीत ठेवावे, असा अर्ज चक्क एका आरोपीने न्यायालयाकडे केला आहे. बीअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक झालेल्या या आरोपीचा अर्ज न्यायालयाने मात्र फेटाळला आहे.शुभम नितीन काळभोर (वय १९, मोरेवस्ती, चिखली) असे लग्न ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा १५ डिसेंबरला साखरपुडा, तर २० डिसेंबरला लग्न आहे. मात्र लग्नासाठी अशा प्रकारचा जामीन देता येणार नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कºहाळे यांनी त्याचा जामीन फेटाळला. याबाबत सविस्तर माहिती अशी, काळभोर त्यांच्या साथीदारांसह २ डिसेंबर रोजी त्रिवेणीनगरमधीलएका बीअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याला चिखली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल आहे.या प्रकरणात जामीन मिळावा, म्हणून त्याने अर्ज केला होता. मात्र तो अर्ज प्रलंबित असतानाच त्याने लग्नासाठी तात्पुरता जामीन मिळावा, म्हणून दुसरा अर्ज केला आहे. माझे २० डिसेंबरला लग्न असून १५ डिसेंबरला साखरपुडा होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे. लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या आहेत. जामीन मिळाला नाही तर सर्व खर्च वाया जाईल, असे त्याने केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्याने केलेल्या अर्जाला विरोध करीत अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला, की तात्पुरता जामीन देण्यासाठी आरोपीने दिलेले कारण कायदेशीरदृष्ट्या चालणार नाही. तसेच आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून परिसरात त्यांची दहशत आहे. काळभोर हा सराईत गुन्हेगार असून जामीन मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा.जामिनासाठी आईचे प्रतिज्ञापत्रशुभम हा रिक्षाचालक आहे. त्याला लग्नासाठी जामीन मिळावा, म्हणून त्याच्या लग्नाच्या पत्रिका न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या.तसेच त्याच्या आईने प्रतिज्ञापत्रदेखील दिले होते. या प्र्रकरणाची पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला पाहिजे होता लग्नासाठी जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:53 AM