घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसाडेसात वाजता घडली. सुलदास उंबºया काळे ऊर्फ कुक्या काळे (वय २५, रा. सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जि. नगर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. घोडेगाव येथील ठाण्यात आरोपीने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे. आरोपीने आत्महत्या केली आहे का? याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोलिसांनी सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्या काळे याला बुधवारी (दि. १३ जून) अहमदनगर पोलिसांकडून लांडेवाडी येथील दरोड्यासंदर्भात कबुली दिल्याने ताब्यात घेतले होते. गुरुवारी घोडेगाव न्यायालयाने ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. आरोपीने अंथरण्यासाठीच्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजेंद्र कांबळे हे घोडेगाव सबजेल येथे गार्डड्यूटी म्हणून नेमणुकीला होते. त्यांची ड्युटी चालू असताना त्यांना त्याच्या कस्टडीतील आरोपी दिसला नाही. त्यामुळे त्यांनी कस्टडीतील शौचालयाकडे पाहिले असता शौचालयाचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. सहायक फौजदार राजेंद्र कांबळे यांनी आरोपीला हाका मारल्या असता, आतून पतिसाद न मिळाल्यामुळेल त्यांनी ड्युटीवर असलेल्या सहकाऱ्याला बोलावून लॉकअपमधून शौचालयाचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपीने गळफास घेतल्याचे दिसून आले. आरोपीच्या आत्महत्येसंदर्भात घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांना सदर माहिती देऊन वरिष्ठांना माहिती कळविली. पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय घोडेगाव या ठिकाणी वैद्यकीय तपासणीकरिता आणले असता डॉक्टरांनी सदर आरोपीला तपासून मृत झाल्याचे जाहीर केले. आरोपीचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात होणार असून ३ डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करेल. अंतिम पंचनामा हा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शवविच्छेदन करताना व्हिडीओग्राफी होणार आहे. घोडेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सदर बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला कळविण्यात आली आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, दयानंद गावडे यांनी भेट दिली.घडलेली घटना दुर्दैवी असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. तर, सदर प्रकरणात प्रसारमाध्यमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुलदास काळे याच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडू केली जात आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आरोपीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 9:50 PM
आरोपीने अंथरण्यासाठीच्या ब्लँकेटची रस्सी बनवून टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेतल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देघोडेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद सदर प्रकरणात प्रसारमाध्यमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न