याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंगोरी येथील वाघेश्वरी मंदिरात गेल्या सहा वर्षांपूर्वी (५ फेब्रुवारी २०१५) अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा उचकटून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचांदीचे असा ९६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. तपासात आरोपींची नावे निष्पन्न होताच १६ सप्टेंबर २०१५ रोजी अमृत पांडुरंग नानावत (वय २५, रा. नांदूर, ता. दौंड) यास अटक केली होती. तर त्याचा साथीदार पोपी लूमसिंग ऊर्फ दीपक राठोड हा फरार होता. राठोड हा कुरकुंभ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या पथकाने बुधवारी सापळा रचून राठोडला ताब्यात घेऊन अटक केली.
राठोडवर पुणे शहर व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व इतर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून, त्याला पुढील तपासासाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.
२५ जेजुरी
आरोपींसमावेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.