पुणे : स्वारगेट, गुलटेकडी परिसरात गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वे स्थानबद्धतेची कारवाई करुन त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
फैजल ऊर्फ गट्ट्या करीम शेख (वय २५, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे. शहरात सक्रीय व दहशत निर्माण करणार्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त गुप्ता यांनी अवलंबिले आहे. त्यानुसार मागील वर्षभरात ११ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले असून या नव्या वर्षात ४ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे.
फैजल शेख याच्याविरुद्ध कोयता, तलवार यासारखी हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत, दंगा, चोरी, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या ४ वर्षात त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणी नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी एमपीडीए कायद्यान्वये फैजल शेख यांच्या स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त गुप्ता यांना सादर केला. अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन फैजल शेख याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला