नऱ्हे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील साईनगरमध्ये १३ एप्रिल रोजी कस्तुरी शेखर माने (वय ४५, रा. शिवपार्वती बंगला, हिंगणे खुर्द) महिलेचा मृतदेह आढळून आला होता. उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सदर महिलेचा खून करून आरोपी रवींद्र श्रीनिवास जालगी (वय ४८, कर्वेनगर) हा फरार झाला होता. सोमवारी (दि.१०) पहाटे पाचच्या सुमारास आरोपीस शिर्डीमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या कर्नाटकच्या असणाऱ्या कस्तुरी माने सिंहगड रस्त्यावरील हिंगणे भागात भाडयाने प्लॅट घेऊन आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. त्या महिलांसाठी ड्रायव्हिंग क्लास घेत असत. आरोपी रवींद्रने मयत कस्तुरी यांच्याकडून वेळोवेळी हातउसने म्हणून आत्तापर्यंत पंधरा लाख रुपये घेतले होते. माने यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली, यावरून दोघांत सतत वाद झाल्याने आरोपीने गळा आवळून त्यांचा खून करून फरार झाला होता. सदर आरोपी हा शिर्डी येथील साईधाम आश्रमात असल्याची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे, तसेच पोलीस शिपाई किशोर शिंदे, बालाजी जाधव, दत्ता सोनवणे , रफिक नदाफ, अविनाश कोंडे यांनी शिर्डी पोलिसांच्या मदतीने आरोपीला सोमवारी पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली.