पुणे : मुलगी अल्पवयीन असल्याने वडिलांनी लग्नास नकार दिल्याने ७ वर्षीय मुलीचा धारधार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आणि १४ वर्षांच्या मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
महेंद्र दत्तु तळपे (वय २४, रा. भोतेवाडी, ता. खेड) असे जामीन फेटाळलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्या ४२ वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २१ मे २०१६ रोजी रोजी सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावी घडली होती. फिर्यादी यांची मुलगी १४ वर्षांची होती. तळपे फिर्यादीकडे त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची मागणी करीत होता. मात्र, मुलीचे वय लहान असल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे तळपे चिडला होता. घटनेच्या दिवशी १४ वर्षांची मुलगी आपल्या ७ वर्षांच्या भाचीसह निर्जनस्थळी शौचास गेली होती. त्यावेळी तळपे याने धारधार हत्याराने वार करून सात वर्षांच्या मुलीचा खून केला. तर १४ वर्षीय मुलीच्या गळ्यावर वार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तळपे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. ही अतिशय क्रूर घटना आहे. घटनेचे गांभीर्य पाहून जामिन फेटाळावा, असा युक्तीवाद अॅड. पाठक यांनी केला.