लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह फसवणुकीच्या प्रकरणात मंगळवारीच मोक्काची कारवाई झालेल्या महिला वकीलाचा पळून जाण्याच्या प्रयत्नात ससून रुग्णालयातील आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोरोनावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ॲड. दीप्ती काळे असे या महिला वकीलाचे नाव आहे. मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दीप्ती काळेला पोलिसांनी अटक केली होती. दीप्ती काळे हिला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. दुपारी ती कपडे धुण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. जवळपास २० मिनिटे झाली तरी बाहेर न आल्याने गार्डने आतील कानोसा घेतला. परंतु, आतून काहीही आवाज येत नव्हता. तेव्हा इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून ठेवलेल्या दिसून येत होत्या. ती खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. याच दरम्यान, खाली एका महिलेचा पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी खाली जाऊन पाहिल्यावर ती दीप्ती काळे असल्याचे निष्पन्न झाले. हे लक्षात येताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी सांगितले की, दीप्ती काळे हिने खिडकीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बाथरुमच्या डकमध्ये अरुंद जागा आहे. तेथील पाईपवरुन तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला असावा. त्यातून ती खाली पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले की, दीप्ती काळे हिला कोरोनाची लागण झाल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील खिडकीतून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात खाली पडून तिचा मृत्यू झाला.
दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना विश्रामबाग पोलिसांनी १८ एप्रिल रोजी अटक केली होती. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असताना दीप्ती काळे हिने औषधांच्या गोळ्या घेतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार करण्यात येत होते.