ठळक मुद्देतब्बल १०० गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यापैकी ४४ गुन्ह्यातील ऐवज जप्तसोनसाखळी चोरीचे १९, बॅग लिफ्टिंगचे २२ , वाहनचोरी ३ गुन्ह्यांचा समावेश
पुणे : चोरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून हॉटेल सुरु करणाऱ्या व प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा बुरखा फाडण्यात पुणे पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून तब्बल ४४ सोनसाखळी चोऱ्या व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे़. त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़. त्यांनी अशा प्रकारचे तब्बल १०० गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यापैकी ४४ गुन्ह्यातील ऐवज मिळाला आहे़. राजू खेमू राठोड ऊर्फ राजाभाऊ खेमराज राठोड (वय ३४, रा़. जुना मुंढवा रोड , वडगाव शेरी, मुळ गाव. एकंबी लमाणतांडा, उजनी, जि. लातूर) आणि शंकरराव ऊर्फ शिवा रामदास बिरादार (वय ३४, रा़ कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, मुळ गाव, हैदराबाद) अशी त्यांची नावे आहेत़. सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र विशेष जेथे बाहेरगावाहून येणाऱ्या बसगाड्या उभ्या राहतात व प्रवासी रिक्षाने जातात. त्या ठिकाणी पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत गस्त लावली होती़. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांची ही गस्त चालू असतानाही चोरटे त्यांना हाताशी लागले नव्हते़. त्याच गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना या दोघांविषयी माहिती मिळाली़. त्यांनी १० सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजता मांजरी ग्रीन सोसायटी रोडवर सापळा रचून त्यांना पकडले़. त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या ४०० सीसीची मोटरसायकल तसेच त्यांच्याकडे अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने सापडले़. त्याबाबत चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली़. त्यांच्याकडे कोणी अडविले तर पळून जाण्यासाठी डोळ्यावर मारण्याचा स्प्रे, स्टीलचा फायटर या वस्तूही मिळाल्या़. पण, त्याबाबत ते काहीही सांगत नव्हते़ त्यांच्याकडील ४०० सीसीची मोटरसायकल चोरीची असल्याचे उघड झाल्यावर त्यांनी आपण सोनसाखळी व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली़.. त्यांच्याकडून पुणे शहरातील हडपसर, कोंढवा, वारजे, माळवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, डेक्कन, शिवाजीनगर, बंडगार्डन, कोथरुड, स्वारगेट, येरवडा, विमानतळ, कोरेगाव पार्क, विश्रामबाग, पिंपरी, भोसरी, निगडी, तसेच पुणे ग्रामीण कडील लोणी काळभोर, यवत व देहुरोड पोलीस ठाण्यातील ४४ गुन्हे उघडकीस आले आहे़. त्यामध्ये सोनसाखळी चोरीचे १९, बॅग लिफ्टिंगचे २२ , वाहनचोरी ३ गुन्ह्यांचा समावेश आहे़.त्यात २३ लाख ६३ हजार ६७८ रुपयांचे ८५६़ ४६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या दोन आंगठ्या व चांदीचा शिक्का, २ मोटरसायकली, १० मोबाईल हँडसेट असा ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक संतोष तासगांवकर, भालचंद्र ढवळे, सहायक फौजदार लक्ष्मण शिंदे, अजय जाधव, हवालदार संतोष मोहिते, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, सचिन घोलप, समीर शेख, अमजद पठाण, केरबा गलांडे, प्रदीप सर्वे, पोलीस नाईक प्रमोद घाडगे, दया शेगर, प्रमोद गायकवाड, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अंकुश काळभोर, अंकुश जोगदंडे, अशोक शेलार, संजयकुमार दळवी, स्रेहल जाधव यांनी केली आहे़.