लोणावळा : लोणावळ्यातील लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पुण्यातील सचिन लल्लन उपाध्याय (वय 21) या युवकाला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात येथिल शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.सचिन उपाध्याय हा त्यांच्या काही मित्रांच्या सोबत रविवारी (दि.४) लोणावळ्यात फिरायला आला होता. दुपारच्या सुमारास ते सर्व मित्र लायन्स पॉईट येथिल दरीला लावण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगच्या पुढे असलेल्या अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मस्ती करत असताना सचिनचा पाय घसरला व तो दरीत पडला. सुदैवाने 60 फुट अंतरावर एका झाडाच्या खोडाला तो अडकला. अंगाला मुका मार लागला होता व दरीच्या वर येण्याकरिता मार्ग नसल्याने तो स्वतःला वाचविण्याकरिता याचना करत होता त्याचे मित्रदेखिल प्रयत्न करत होते. या दरम्यान शिवदुर्गचे वैभव शेलार यांना लायन्स पॉईटच्या दरीत एक युवक पडला असल्याचा फोन आला व लोणावळ्यातील शिवदुर्गची टिम तातडीने रेस्कूचे सर्व साहित्य गोळा करत लायन्स पॉईटकडे रवाना झाली. घटनास्थळाचा अंदाज घेत अजय शेलार व प्रविण देशमुख हे दरीत उतरले, हार्निस व दोरच्या सहाय्याने त्यांनी सचिन उपाध्याय याला सुखरुपपणे दरीतून बाहेर काढले. शिवदुर्ग मित्रचे प्रविण देशमुख, वैभव शेलार, अभिजीत बोरकर, समीर जोशी, पुनिकेत गायकवाड, तुषार केंडे, राजेंद्र कडु, अजय राऊत, प्राजक्ता बनसोड, वैष्णवी भांगरे, सुनिल गायकवाड हे या मोहिमेत सहभागी झाले होते.
लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात शिवदुर्गला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 8:50 AM