पुणे : एका परिचितानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या कुटुंबीयांना हॉटेलमध्ये पार्टी देऊन त्यांच्या घरावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव परिसरात हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादीच्या घरी चोरलेला काही मुद्देमाल परत केलाही; त्यामुळे त्याची फारशी वाच्यता झाली नाही ना गुन्हा दाखल केला. मात्र सोन्याचे दागिने परत न केल्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी मोहन पंढरीनाथ ढोणे (वय ६३, रा. कोरेगाव, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र शेषराव अवधूत (रा. मूळ बार्शी, सोलापूर) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त शिक्षक असून, आरोपी रवींद्र हा भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. दोघे ही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. रवींद्रने ७ फेब्रुवारीला सायंकाळी मोहनला आणि त्यांच्या पत्नीला उरळी कांचनमधील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार मोहन साडेसातच्या सुमारास हॉटेलला पोहोचले होते. त्यावेळी रवींद्रने दोघांना हॉटेलमध्ये बसवले. ‘घरी जाऊन मुलांना घेऊन येतो’ असा बहाणा करत आरोपी तेथून निघाला आणि तो थेट मोहन यांच्या घरी पोहोचला. त्याने बनावट चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि चांदीची मूर्ती असा १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यामुळे घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, रवींद्रने चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर चांदीची मूर्तीदेखील लगेच परत केली होती. मात्र, सोन्याचे दागिने परत केलेले नाहीत. त्यामुळे मोहन यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.