पुणे : यावर्षी १० मे राेजी डॉ. दाभाेलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्यात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि ५ लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली. परंतु, यातील विरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या आरोपींच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करूनही सीबीआयने अपील दाखल केली नाही. सीबीआयने तातडीने अपील दाखल करणे आवश्यक आहे, अशी मागणी मुक्ता दाभाेलकर यांनी केली.
डॉ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येच्या घटनेला ११ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मंगळवारी एकत्र जमून दाभोलकर यांना अभिवादन केले. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. यावेळी मिलिंद देशमुख, हमीद दाभोळकर, नंदिनी जाधव, प्रवीण देशमुख, अण्णा कडलासकर, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, गणेश चिंचोले व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी देशमुख आणि हमीद दाभोलकर म्हणाले, नरेंद्र दाभोलकरांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी खासदारांना निवेदन देणार आहेत व राष्ट्रव्यापी जादुटोणाविरोधी कायदा होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करणार आहेत. तसेच पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी पोलिस स्टेशनला निवेदन देणार आहेत.