पुणे : ८६५ किलो गांजा बाळगणे आणि त्याची वाहतूक केल्या प्रकरणाचा निकाल चार वर्षांनी लागला आहे. या आरोपातून सहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावेळी डीआरआय पुणेने केलेली ही मोठी कारवाई होती. खेड येथील विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा निकाल दिला आहे.
गुंडूराव बाबूराव पाटील, इल्लाईबक्श बाबामियाँ मुंढे, नसीर खान पठाण, अमित बिडकर, दीपक केशव खाटपे आणि नाना चंद्रन अशी त्या सहा जणांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ॲड. राजू लक्ष्मणराव मते आणि श्रीनाथ राजू मते यांनी न्यायालयात बाजू मांडली. १९ मे २०१९ रोजी खेड तालुक्यातील बेल्हे येथे डीआरआय पुणेने ही कारवाई केली होती. सहा जणांवर एनडीपीएस (अमली पदार्थ विरोधी कायदा) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र, या कायद्यातील तरतुदींची पूर्तता न केल्याने सहा जणांची मुक्तता करण्यात आली आहे.