पुणे : ध्यानधारणेप्रमाणेच अभिनय करणे हे देखील त्या क्षणी पूर्णपणे एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. त्या क्षणामध्ये असणे म्हणजे परिस्थितीवर विश्वास ठेवण्यासारखे असून, एखाद्या भूमिकेमध्ये स्वत:ला झोकून देणे असते, अशा शब्दांत राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांनी अभिनयाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना सांगितला.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या वतीने (एफटीआयआय) आयोजित आॅनलाईन संवादात बायपेयी यांनी अभिनयाचे गमक उलगडण्याबरोबरच चित्रपट प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर लंडनवरून तर एफटीआयआयमधील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
उत्तराखंड येथील शूटिंग ठिकाणाहून बाजपेयी आॅनलाइन संवादात सहभागी झाले होते. बँडिट क्वीन ते सत्या आणि गँग्स आॅफ वासेपूर ते भोसले असा माझा अभिनय प्रवास झाला. ‘शूल’मधील भूमिका ही मी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक आहे. कलाकाराने चित्रपट, मालिका किंवा ओटीटी व्यासपीठ असो कुठल्याही माध्यमात अभिनय करताना डोळ्यांसमोर चित्रपटनिर्माते किंवा दिग्दर्शक यांची दूरदृष्टी हृदयात ठेवून काम केले पाहिजे. त्या भूमिकेत स्वत:ला झोकून दिले पाहिजे. अभिनय खऱ्या अर्थाने त्या क्षणाला जगता आला पाहिजे.
--------------------------------------------