दावडी : शाळा, विद्यालय, कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने वर्षभरात अकराशे दहा प्रतिबंधात्मक कारवाया खेड, मंचर, चाकण व आळंदी या परिसरात केल्या आहेत. निर्भया पथकाचा रोडरोमिओंवर वचक असल्याचे दिसून येत आहे. निर्भया पथकाने खेड, मंचर, चाकण व आळंदी येथील ४०५ शाळा-महाविद्यालयांत भेटी दिल्या आहेत.शहरातील व ग्रामीण भागातील विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयांच्या आजूबाजूला रोडरोमिओंचा वावर असतो, विद्यार्थिनींना अशा रोडरोमिओंकडून छेडछाड करण्याच्या घटनाही घडतात. या छेडछाडीची तक्रार करण्यासही विद्यार्थिनी घाबरत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर, पोलीस प्रशासनाने निर्भया पथकाची स्थापना केली. या पथकाला वाहन देऊन महिला पोलीस अधिकारी या पथकात सामील केले.वर्षभरात या पथकाने ४०५ शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना भेटी देऊन मुला- मुलींचे समुपदेशन करून जनजागृती केली.तसेच, शहरात व ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेले अपघातातील वाढ लक्षात घेता वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुले व मुलींवरती निर्भया पथकाने कारवाई सुरू केली असून, संबधित मुलाच्या पालकाला बोलवून याबाबत समज देण्यात येत आहे.१५ आॅगस्ट २०१८ रोजी खेड तालुक्यातील चाकण व आळंदी ही शहरे आयुक्ताला जोडल्यामुळे तेव्हापासून खेड, मंचर, घोडेगाव ही शहरे खेड पोलीस स्टेशन निर्भया पथकांतर्गत येत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक अर्चना दयाळ, महिला पोलीस सारिका बनकर यांच्या पथकाने रोडरोमिओंवरती चांगलाच वचक बसविला होता.मध्यवर्ती ठिकाणी शहरात साधारणत: दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत शाळा-कॉलेजच्या आसपास रोडरोमिओंचा सुळसुळाट असतो, निर्भया पथक यावेळी अशा शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सातत्याने राऊंड मारते, एखाद्या विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर लगेचच हे पथक घटनास्थळी जाऊन कारवाई करते. रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी निर्भया पथकाच्या वतीने शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येते. दोन रोडरोमिओंवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील व शहरातील महाविद्यालय व शाळांमध्ये भेटी देतो, एखादी तक्रार आली तर लगेचच आम्ही त्यावर कारवाई करतो, विद्यार्थिनींच्या काही तक्रारी असतील, तर आमच्याशी संपर्क साधावा, विद्यार्थिनींनी घाबरून जाऊ नये.- श्रीराम पडवळ (सहायक पोलीस निरीक्षक, निर्भया पथकप्रमुख )शहरातील व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींना रोडरोमिओंपासून बचाव करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, यामुळे विद्यार्थिनींना आपले संरक्षण करता येईल. तसेच कोणी विनाकारण त्रास देत असेल, दुचाकी चालवून मागे-पुढे फिरत असेल तर थेट खेड, मंचर, घोडेगाव येथील पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, संबधित रोडरोमिओंवरती कारवाई करण्यात येईल. - विजया गारगोटे (पोलीस, निर्भया पथक प्रमुख )सध्या कॉलेज तरुणांमध्ये मित्राचे वाढदिवस करण्याची प्रथा सुरू झाली आहे. काही तरुण मुले मित्रांना सोबत घेऊन शैक्षणिक ठिकाणी, तसेच रस्त्यावर केक आणून फटाके लावून वाढदिवस साजरा करतात. तसेच, काही तरुण एकमेकांना अंडी मारून वाढदिवस साजरा करतात, त्यांचा इतर कॉलेज तरुणींना व नागरिकांना त्रास होतो. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी पाबळ रोड येथे फटाके का वाजतात म्हणून एक पोलीस अधिकारी थेट तिथे गेले असता, पोलीस आले हे पाहता तरुणांनी कापण्यासाठी आणलेला केक तिथेच सोडून तेथून पळ काढला..- गजानन टोम्पे. उपविभागीय पोलीस अधिकारी खेड.
निर्भया पथकाचा रोडरोमिओंवर वचक; वर्षभरात १११० जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:10 AM