वडगाव मावळ : शाळेच्या वेळेत शाळा बंद असल्याने मावळातील जिल्हा परिषदेच्या आठ शाळांतील १९ शिक्षकांवर एक दिवस विनावेतन अशी कारवाई करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या सभापती मंगला वाळुज यांनी बुधवारी सांगिसे केंद्रातील विविध शाळांना अचानक भेट दिली. तेव्हा सकाळी ७ ते ११ या वेळेत आठ शाळा बंद आढळल्या. या शाळांतील शिक्षकांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना दिल्या. त्यानुसार संबंधितांनी १९ शिक्षकांचा तो एक दिवस विनावेतन केल्याची नोटीस दिली आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख देवडकर यांनी दिली. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शिक्षकांवरील या कारवाईने मावळातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांत नाराजी आहे. दुर्गम भागामध्ये सकाळी सातला शाळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षिकांना तर प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शाळेत राबवायचे नवनवे उपक्रम, सततची सरकारी कामे, वेगवेगळे आदेश, अधिकाऱ्यांना क्षणात द्यावी लागणारी माहिती, शालेय पोषण आहाराची जबाबदारी, शाळा व्यवस्थापन समितीला द्यायची उत्तरे, दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या व अर्थपूर्ण व्यवहारातून केलेल्या तोंडी बदल्या या सर्व बाबींमध्ये मावळातील शिक्षक भरडला जात आहे. दोन-दोन महिने पगार होत नाही. या विषयावर मात्र अधिकारी व पदाधिकारी गप्प असतात, शासन आदेशाचे पालन करणे हे शिक्षकांचे कर्तव्यच आहे. (वार्ताहर)
आठ शाळा बंद, १९ शिक्षकांवर कारवाई
By admin | Published: April 22, 2016 12:54 AM