पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या प्रवासी स्थानकांच्या परिसरात अवैध टप्पा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल २३२ वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल नऊ लाख रूपयांंचा दंड वसूल करण्यात आला असून मागील महिन्याभरात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. ही कारवाई या पुढेही कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या कारवाईत प्रामुख्याने शहरातील प्रमुख बसस्थानके तसेचकाही पीएमपी स्थानकांच्या परिसरात प्रवासी पळविणा-या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या स्थानकाच्या परिसरात २00 मीटर परिसरात प्रवासी वाहतूक करण्यास मनाई असतानाही या वाहनधारकांकडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. रस्ता सुरक्षा पंधरडया निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रवाशांच्या जनजागृती बरोबरच अवैध टप्पा प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
प्रवासी पळविणाऱ्या २३२ वाहनांवर कारवाई
By admin | Published: January 22, 2016 1:24 AM