लोणावळा : शनिवार व रविवारी पर्यटनासाठी लोणावळ्यात येऊन हुल्लडबाजी करत वाहन चालविणारे तसेच विविध प्रकारे वाहतुक नियमांचा भंग करणार्या तब्बल 400 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत लोणावळा शहर पोलिसांनी जवळपास दोन लाख रुपयांचा दंड केला. वर्षाविहाराला येणार्या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. यावेळी वाहतुक नियमांची पायमल्ली करत विरुध्द दिशेने वाहने पुढे आणत वाहतुक कोंडीत भर घालणारे वाहन चालक, दुचाकी वरुन ट्रिपल सिट जाणारे पर्यटक, पोलिसांचा इशारा न मानने, लायसन्स जवळ न बाळगणे, धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, नो पार्किंगच्या जागेवर वाहने पार्किंग करणे असे प्रकार करणार्या जवळपास 400 वाहनांवर लोणावळा शहर पोलीसांनी ई चलनद्वारे कारवाई करत त्यांना जवळपास दोन लाखांचा दंड केला. लोणावळा शहरात व पर्यटनस्थळांकडे जाणार्या मार्गावर पोलिसांनी स्पिकरद्वारे पर्यटकांना वाहतुक नियमन व पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते येथील वाहतुक कोंडी याबाबत सुचना देण्याची व्यवस्था केली आहे. वारंवार सुचना देऊन पर्यटक नियमांचा भंग करत असल्याने कारवाईचा बडगा उचलावा लागला असे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले. भुशी धरणावर देखील पर्यटकांना सुचना देण्याकरिता स्पिकर व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी धांगडधिंगा करु नये, दिलेल्या सुचनांचे पालन करावे, पर्यटनस्थळांवर मद्यप्राशन करु नये, मद्यप्राशन करुन वाहने चालवू नयेत अशा सुचना देणारे फलक देखील जागोजागी लावण्यात आले आहे.
वाहतुक नियमांचा भंग करणार्या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:55 PM
वर्षाविहाराला येणार्या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.
ठळक मुद्देभुशी धरणावर देखील पर्यटकांना सुचना देण्याकरिता स्पिकर व्यवस्था