पुणे : आवकेपेक्षा गाळ्यावर प्रत्यक्ष जास्त माल विक्रीसाठी आणून बाजार समितीची फसवणूक करणाऱ्या १५७ टेम्पोधारकांवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने सोमवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये १ लाख ९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यात फळे, भाजीपाला आणि कांदा-बटाट विभागात हा प्रकार घडला. माल कमी दाखवून जास्त माल आणणाऱ्या टेम्पोधारकांवर कारवाई करण्याची बाजार समितीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. बाजार आवारातील भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी माजी सैनिक गस्त घालत आहेत. बाजार आवारात शिस्त लावण्यासाठी ही पद्धत सुरू केली आहे. बाजार समितीचे अधिकारी आणि माजी सैनिकांच्या संयुक्त मोहिमेने ही कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, दीपक तांगडे यांचे पथक २६ एप्रिल २०२१ पासून रात्रपाळीमध्ये अशा कारवाई करण्यासाठी नियुक्त केले आहे. माजी सैनिकांच्या मदतीने प्रवेशद्वारावरील आवक आणि प्रत्यक्ष झालेली आवक यातील तफावत तपासून कारवाई होत आहे. त्यामुळे आवक कमी दाखविण्याच्या प्रकाराला आता आळा बसत आहे.