पुणे : रेल्वेतून फुकट्या प्रवास करणार्यांची संख्या काही केल्या कमी होईना. त्यामुळे पुणे विभागातील अधिकार्यांकडून तिकीट तपासणी मोहीम आखून फुकट्यांवर कारवाई करण्यात येते. पुणे रेल्वे विभागात सप्टेंबर महिन्यामध्ये तिकीट तपासणी दरम्यान १७ हजार ६२२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ४२ लाख १७ हजार रुपये इतके दंड वसूल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर सामान बुक न करता घेऊन जाणार्या १५६ प्रवाशांकडून २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह , वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा; अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल. न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.