शिवणे: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मागच्या आठवड्यात सिंहगडावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे १९ आणि २० जूनला सिंहगड, खडकवासला येथे फिरण्यासाठी आलेल्या एकूण ३०९ जणांवर कारवाई करून एक लाख १३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार अजूनही सिंहगड किल्ला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत.
कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर हवेली ग्रामीण पोलीसाकडून कारवाई करण्यात आली आहे. तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. ३ पोलीस अधिकारी, २२ पोलीस कर्मचारी आणि १० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. खडकवासला आणि सिंहगडावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात कोरोना नियमांचा भंग करून खडकवासला परिसरात शनिवार आणि रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्या एकूण १३२ जणांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. त्यात ४७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी १७७ लोकांवर कारवाई करून ६६ हजार ३०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध या पुढेही गुन्हा दाखल केले जातील. काही पर्यटक छुप्या पद्धतीने गडावर जातात. त्यांच्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.