शनिवार व रविवार वीक एन्ड लॉकडाऊन काळात पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात शुकशुकाट होता. व्यावसायिकांनी या वीक एन्ड लॉकडाऊनला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. त्यामुळे पोलिसांना विशेष कोणतीही कारवाई करण्याची गरज भासली नाही.
पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भात काही किरकोळ कारवाई करण्यात आल्या. शनिवार रविवारी सासवड पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्या १० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर जेजुरी पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्या ३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत १६ हजार रुपयांचा दंड वसुल केले. सासवड पोलीसांनी जमावबंदी उल्लंघन १८८ प्रमाणे ५ ठिकाणी कारवाई करत ५ हजार रुपये दंड वसुल केला. तर जेजुरी पोलीसांना जमावबंदी उल्लंघन १८८ प्रमाणे एकाही ठिकाणी कारवाई करावी लागली नाही.
शनिवार व रविवारी पोलीसांनी कोठेही जास्त कारवाई करावी लागली नाही. गेली वर्षभर जसे विनामास्क, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, कोरोनाचे नियम न पाळणे, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणे, दुकानांमध्ये गर्दी करणे अशा ठिकाणी वारंवार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल केले. पण वीक एन्ड लॉकडाऊनच्या काळात अशा कारवाई करण्याची वेळच लोकांनी येऊ दिली नाही.