शिवगंगा खोऱ्यातील बेकायदा धंदे मोडीत काढून नियम न पाळणाऱ्या नागरिकांना राजगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला. शासनाने नियम शिथिल केल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. कोरोना नियमांनाही हरताळ फासला आहे. त्यात बंदचा फायदा उठवत अनेक अवैध धंद्यानाही खेड शिवापूर परिसरात उत आला होता. अवैध धंद्याचा जोर वाढत असताना भोरचे उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, सहायक पोलिस उपनिरीक्षक नरेश येमुल, सहायक फौजदार कृष्णा कदम, संतोष तोडकर, संतोष कालेकर, सोमनाथ जाधव, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने खेड शिवापूर परिसरातील जुगार अड्डे, गावठी दारू अड्डे, देशी- विदेशी दारू चोरून विकणारे ठिकाणे यांच्यावर धाड टाकत अवैध धंदे नेस्तनाबूत केले.
दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विना लायसन वाहन चालविणे, गर्दी करणे, परवानगी नसताना दुकाने उघडणे अशा नागरिकांवर सुद्धा कारवाई करून कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. केवळ २२ दिवसांत ४६१ जणांवर कारवाई करून २ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे गोपनीय विभागाचे भगीरथ घुले यांनी सांगितले.