पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठविण्यात आल्यानंतर दुकाने, हॉटेल्ससह विविध आस्थापना सुरु करण्यात आल्या. या आस्थापनांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. या सूचनांचे पालन होते की नाही याची तपासणी पालिकेकडून करण्यात येत असून आतापर्यंत ५०६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, १ लाख ७८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून त्यांच्या हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल, दुकाने आणि अन्य आस्थापनांची तपासणी केली जात आहे. आस्थापनांमध्ये येणा-या ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवणे, त्यांनी मास्क परिधान केला आहे की नाही याची खात्री करणे, सुरक्षित अंतर राखले जाणे आवश्यक आहे. तशा सूचना आस्थापना सुरु करण्यापुर्वीच पालिकेने दिलेल्या आहेत. याबाबतचा आदेश पालिकेने काढलेला आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन होत असून त्याकडे आस्थापनाचालक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालिकेने तपासणी करुन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
====
पालिकेने केलेल्या कारवाईचा तपशील
प्रकार तपासणी कारवाई दंड वसुली
हॉटेल २५३ । ५७ । ३५ हजार ५००
रेस्टॉरंट १५१। २३ । १३ हजार
बार ५५। ०८ । १० हजार
मॉल २४ । १७ । १२ हजार ५००
दुकाने ६०७ । १३६ । २९ हजार ५८०
अन्य आस्थापना ५८५। २५८ । ७७ हजार ४४०