पुणे : वाहनांच्या काळ्या काचा काढून टाकाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल, अशा सूचना देऊनही त्याचे पालन वाहनचालकांनी न केल्यामुळे अखेर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला. वाहनांच्या काळ्या काचांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई मोहीम राबविली. यामध्ये ८८२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून, काचांच्या काळ्या फिती काढण्यात आल्या. यामध्ये एक लाख ७९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.वाहनांच्या कांचाना काळ्या फिती लावण्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत बंदी आहे. वाहनांच्या पुढील व मागील काचा ७५ टक्के पारदर्शक आणि बाजूच्या काचा ५० टक्के पारदर्शक असाव्यात, असा नियम आहे. या नियमांनुसारच वाहन उत्पादन केले जाते. त्या काचांवर नव्याने काळ्या फिती लावण्यास परवानगी नाही. त्यामुळे या वाहनांवर कारवाई केली जाते. वाहनचालकांना यापूर्वी अनेकदा काळ्या फिती काढण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच दंडाची कारवाईदेखील केली आहे. मात्र, परिस्थिती अद्याप जैसे थेच राहिल्याने ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
काळ्या काचांविरोधात धडक कारवाई
By admin | Published: April 26, 2017 4:13 AM