आळंदी : अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली आध्यात्मिक परंपरा सांगणारी पायी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अलंकापुरी या सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. पालिकेने यासाठी कंबर कसली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आजपासून (दि. ११) कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिकेने छोट्या व्यावसायिकांना स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत छोट्या व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढली. यामुळे अतिक्रमणाने व्यापलेला आळंदीतील निम्मा भाग मोकळा झाला असून, पालिकेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.प्रदक्षिणा मार्ग, मरकळ रस्ता, वडगाव रस्ता, इंद्रायणी घाट रस्त्यावरील व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढत आहेत. त्यामुळे आजपासून दोन ते तीन दिवस स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सवलत दिली जाणार असून, तद्नंतर मात्र पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार आहे. (वार्ताहर) परराज्यांतील वारकरी : दाखल होण्यास सुरुवातसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी परराज्यांतील दुर्गम भागातून वारकरी आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत राज्यासह परराज्यांतून भाविक लाखोंच्या संख्येने आळंदीत दाखल होणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे काम सद्या प्रशासनाकडून हातात घेण्यात आले आहे. याच दृष्टीने शुक्रवारी प्रांताधिकारी खराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत तत्काळ अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशान्वये आज पालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांना तोंडी व लेखी सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेचे पालन करत काही व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे काढली.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी पालखी सोहळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असून, या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली जात आहे. पालिकेकडून दोन ते तीन दिवस व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले जात असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वत:हून अतिक्रमणे हटवा, कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे. - डॉ. संतोष टेंगळे, मुख्याधिकारी
आळंदी शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई
By admin | Published: June 12, 2016 5:58 AM