पुणे : मार्केटयार्ड येथील विद्यासागर कॉलनीमधील एका बंगल्यात रात्रभर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मार्केटयार्ड पोलिसांनी आज पहाटे छापा घातला. या बंगल्याचा दरवाजाला बाहेरुन लावलेले कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आतील १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
जुगार अड्डा चालविणार्या हर्षल पारेख याच्या सांगण्यावरुन ते बंगल्यात जुगार खेळण्यासाठी आले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड येथील नगरसेवकापासून महापालिकेतील ठेकेदारांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून त्यांच्याकडील ५३ हजार ९०० रुपये व १ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकली जप्त केले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन विनामास्क जुगार खेळताना आढळून आल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केटयार्डमधील विपूल बंगल्यात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे या आपल्या सहकार्यांसह गेल्या. तेव्हा बंगल्याच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावले होते. परंतु, बंगल्याच्या खिडकीतून आत पाहिल्यावर आतमध्ये १५ ते २० जण असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी पंचासमक्ष कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमधील लोकांनी हर्षल पारेख यांच्या सांगण्यावरुन आम्ही येथे जुगार खेळण्यासाठी आलो. तो तुम्हाला जेवण आणून देतो, असे सांगून बाहेरुन कुलूप लावून गेला असल्याचे जुगार खेळणार्यांनी सांगितले. हर्षल पारेख हा मार्केटयार्ड परिसरात जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी तो बंद पाडल्यानंतर त्याने बंगल्याच जुगाराचा अड्डा सुरु केला. या ठिकाणी त्याचे वडिल व त्यांचे ५ साथीदार व इतर जुगार खेळणारे आढळले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान, एका ठिकाणी इतके सर्व जण एकत्र आले असल्याने पोलिसांनी या सर्वांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर सर्वांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आले.