पुणे : जी-२० परिषदेनिमित्त पुण्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून शहरात रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे जोमात सुरू आहेत. काही बेशिस्त नागरिकांकडून राजरोसपणे पिचकाऱ्या मारल्या जात आहेत. अशांवर महापालिका कारवाई करत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, प्लास्टिक कारवाई यावर १ ते १० जानेवारी दरम्यान ५२१ जणावंर कारवाई करून २ लाख ६८ हजार ४६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जगभरातील ३६ देशांतील १२० प्रतिनिधी जी-२० परिषदेसाठी १५ ते १७ जानेवारी दरम्यान शहरात येणार आहेत. या प्रतिनिधींच्या बैठका सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये होणार आहेत. तसेच हे परदेशी पाहुणे शहरातील इतर ठिकाणांनाही भेट देणार आहेत. त्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून विविध कामे केली जात आहेत. यामध्ये महापालिका प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी रंगरंगोटी व सुशोभीकरणाची कामे केली जात आहेत.
बेशिस्त पिचकारी बहाद्दरांकडून रस्त्यावरील पेंटिगवर गुटखा आणि पान तंबाखू खाऊन थुंकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जी-२० परिषदेसाठी रंगकाम केलेल्या भिंती, रस्ते, रस्ते दुभाजक बेरंग होत आहेत. तसेच नागरिकांनी या गोष्टी टाळण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सदस्य येण्याच्या आदल्या रात्री रस्ते, भिंती व रस्ते दुभाजक धुण्याचा निर्णय घेतला आहे. या पिचकारी बहाद्दरांवर वचक बसविण्यासाठी दंडात्मक करावाई सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली.
अशी केली कारवाई
- गेल्या दहा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २३ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २३ हजारांचा दंड वसूल केला आहे.- सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या ४२२ जणांकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांचा दंड वसूल केला आहे.- सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांकडून २ हजार ६०० रुपये- १७ ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांकडून ९ हजार ५००, वर्गीकरण न करता कचरा दिल्याबद्दल ३० जणांकडून ३ हजार ७६० रुपये दंड वसूल केला आहे.- बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या दहा जणांवर कारवाई करून ३८ हजार, प्लास्टिक कारवाई सात ठिकाणी करून ३५ हजाराचा दंड वसूल केला आहे.