पुणे : कोरोना काळात जादा बिले आकारून औषधे दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पूना हॉस्पिटलमधील दोन मेडिकल स्टोअर्सवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून एक मेडिकलचा परवाना ३० दिवसांकरिता तर दुसऱ्या मेडिकलचा परवाना ७ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.
पूना हॉस्पिटलमधील मेडिकलच्या बिलांची चौकशी करण्याबाबत तक्रार करण्यात आली होती. मेडिकलची बिले वाढीव देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडून रुग्णालयाच्या सेंट्रल मेडिकल स्टोअर्स आणि पूना हॉस्पिटल मेडिकल स्टोअरची चौकशी करण्यात आली. तपासणीमध्ये दोष व त्रुटी आढळून आल्या. त्याप्रमाणे सेंट्रल मेडिकल स्टोअरचा परवाना १ मे ते ३० मे या कालावधीकरिता तर दुसऱ्या मेडिकलचा परवाना २४ मे ते ३० मे या कालावधीकरिता निलंबित करण्यात आला आहे.