लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्ड मधील फळ विभागात अनाधिकृतपणे शेतमालाची विक्री करणा-यांवर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या अनधिकृत विक्रेत्यांकडून बाजार समिती प्रशासनाने सुमारे ५ हजार ३१० रुपयांचा दंड वसूल केला आहे. फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांमध्ये बाजार आवारात विना मास्क फिरणा-या बाजार घटकातील व्यक्ती आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यानंतर रविवार (दि.२७) अनाधिकृतपणे स्टॉल लावून शेतमालाची विक्री करणा-यांकडे बाजार समितीच्या कारवाईचा मोर्चा वळविण्यात आला. ९ अनधिकृतरित्या विक्री करणा-यांवर कारवाई करण्यात आली. ५०० रूपये दंड व त्यावर ९० रूपये जीएसटी असे एकूण प्रत्येकी ५९० रुपये बाजार समितीने संबंधितांना दंड आकारला आहे. या कारवाईमुळे अनाधिकृत विक्री करणा-यांना जरब बसणार आहे. या कारवाईचे विविध बाजार घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.