डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील पिंपळी गावामध्ये अवैध दारूधंद्यांवर ‘एक्साइज’ विभागाने कारवाई करून दारूचे ३ हजार लिटर रसायन आणि साहित्य आग लावून नष्ट करण्यात आले आहे. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, एक्साइज विभागाच्या शोभा लांडगे यांनी ही कारवाई केली. त्याच्या समवेत सहायक पोलीस प्रमोद पोरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, युवराज चव्हाण, नंदू जाधव, झारगडवाडीचे ग्रामसेवक शशिकांत शिंदे, पिंपळीचे ग्रामसेवक संजय गावडे, पिंपळीचे माजी सरपंच नितीन देवकाते, पोलीस पाटील मोहन बनकर उपस्थित होते.
सकाळी लवकरच प्रांताधिकारी, तहसीलदार, एक्साइज आॅफिसर आणि त्यांची सर्व टीम झारगडवाडीमध्ये दबंग स्टाइलप्रमाणे दाखल झाली. झारगडवाडी गावांमध्ये अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, कुठेच काही आढळले नाही. त्यावेळी जवळच असलेल्या पिंपळी गावाकडे त्यांनी मोर्चा वळवला. गावालगत असलेल्या कॅनॉलशेजारीच हातभट्टीत दारूने भरलेले २०० लिटरचे १४ बॅरेल आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. ते पोलिसांनी नष्ट केले.