पुणे: पुणे महानगरलिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणाऱ्याने तक्रार दिल्यानंतर विभागाने ही कारवाई केली. स्वप्नील कोठावळे असे लाच घेणार्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार स्वतःच्या टेम्पोने येरवडा भागातील कचरा उचलतात. हा कचरा उचलून येरवडा डेपोत टाकण्याबरोबरच टेम्पो सुरु ठेवण्यासाठी निरीक्षकाने पाच हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार केली होती. प्राप्त तक्रारची शहानिशा करण्यात आली. पुण्याच्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने आज सापळा रचला होता. त्यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील कोठावळेंनी पंचासमक्ष 5 हजार रूपयांची लाच घेतली.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक अप्पर सुरज गुरव, अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबीच्या पथकाने केली आहे. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अॅन्टी करप्शनकडून करण्यात आले आहे.