पुणे : शहरात २५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीला नाल्यांवर झालेली अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली असून त्यातही १४ किलोमीटरच्या आंबिल ओढ्यावर सर्वाधिक अतिक्रमणे झालेली आहेत. या अतिक्रमणांचा सविस्तर अहवाल पालिका प्रशासनाने तयार केला आहे. येत्या मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा अहवाल सादर केला जाणार असून सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले...शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. पालिकेच्या आणि खासगी मालमत्तांसह वाहनांचेही मोठे नुकसान झाले होते. शहरात वीस पेक्षा अधिक जणांचा मृत्यू पुरामुळे झाला होता. अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनीतील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. पुराच्या तडाख्यात अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेकजण त्यातून अद्यापही सावरु शकलेले नाहीत. पुर आल्यानंतर पालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन घेतले. संस्थेने केलेल्या अहवालामध्ये नाल्याच्या पुराची तीब्रता वाढविण्यात अतिक्रमणांचा मोठा वाटा असल्याचे आणि अतिक्रमणांमुळे नाल्याची रुंदी आक्रसल्याचे नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे झालेली असून अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती नाल्यामध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. यासोबतच काही ठिकाणी आजी-माजी नगरसेवकांनी नाल्यातील मोकळ्या जागांवर ‘ताबे’ मारुन तेथे बस्तान मांडल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. या अतिक्रमणांमुळे नाल्याची रुंदी कमी झाल्याचे समोर आले होते. या पुरामुळे महापालिकेच्या पावसाळी आणि मलवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार आहे. याविषयी माहिती देताना, अगरवाल म्हणाल्या, पालिका प्रशासनाने अतिक्रमणांची संपुर्ण माहिती गोळा केली असून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. नाल्याची सद्यस्थितीविषयी त्यामध्ये माहिती असून अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. कात्रज-पासून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत कोठे-कोठे अतिक्रमणे आहेत याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेमध्ये कारवाईविषयी जो निर्णय होईल त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. तशी तयारी प्रशासनाने केल्याचे त्यांनी सांगितले.====टेÑजर पार्क ते बागूल उद्यान या दरम्यानचा नाला सर्वाधिक धोकादायक असून या नाल्याची रुंदी अतिशय कमी झाली आहे. यासोबतच बºयाच सोसायट्यांच्या सीमाभिंती नाल्यात किंवा नाल्यालगत आहेत. अनेक ठिकाणी नाल्याच्या भिंतीवर घरे बांधण्यात आलेली आहेत. प्रायमुव्ह यासंस्थेने तयार केलेल्या अहवालामध्ये नाल्याची रुंदी २२ ते २४ मीटरपर्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात नाल्याची रुंदी ही पाच मीटरपर्यंत कमी झाल्याचे चित्र आहे. महापालिके त्यामुळे विकास आराखड्याप्रमाणे नाल्यावर रेखांकन करुन अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून नाल्याच्या दुरुस्तीसाठी तत्काळ ३ कोटींच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून तातडीच्या कामांसाठी दहा कोटींचा निधी देऊन त्याची निविदा प्रक्रिया राबविली आहे.
नाल्यांवरील अतिक्रमणांवर मुख्यसभेच्या आदेशानुसार होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:57 PM
शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते.
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : सविस्तर अहवाल सादर करणार