विमाननगर : अनेक भाई मोठ्या दिमाखात वाजतगाजत आपले वाढदिवस साजरे करतात. परिसरात आपली दहशत राहावी किंबहुना मार्केटमधील आपलं वजन दहशत दाखवण्यासाठी भाई राडा घालतात. बऱ्याचदा याबद्दल स्थानिक तक्रार करायला धजावत नाहीत. पोलीसदेखील भाईच्या या पॅटर्नकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि त्यातूनच भाईच्या गुन्हेगारीला खतपाणी मिळते. आता तर भाईच्या वाढदिवसात उघडउघड तलवारी आणल्या जात आहेत. एवढंच नाही तर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायलादेखील हे महाभाग कमी करीत नाहीत.
विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाºया दोन भार्इंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भार्इंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली.
रोहित दीपक ठोंबरे (वय २१, मुंजाबावस्ती, धानोरी) व नीतेश बाबासाहेब सरोदे (वय १९, बर्मासेल लोहगाव) या दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. अधिक तपासात नीतेश याने रोहित याच्या वाढदिवसासाठी तलवार आणून याच तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकप्रमुख उपनिरीक्षक अभिजित चौगुले, पोलीस हवालदार प्रवीण राजपूत, कर्मचारी यशवंत किर्वे, विनायक रामाने, प्रवीण भालचिम, वामन सावंत, रिहान पठाण, प्रफुल्ल मोरे, शेखरखराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.